Rohit Pawar News : उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क ; रोहित पवार संतापले...

विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असेल तर त्यासाठीही पैसे ओरबाडणार का ?

Rohit Pawar News : उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क ; रोहित पवार संतापले...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Rohit Pawar News : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा नुकतीच पार पडली आहे. परिक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 1000 हजार रुपये शुक्ल घेण्यात आले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांना उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिकेवर (Response Sheet) आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहेत. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने जाहीर केल्या पत्रावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, '' विद्यार्थ्यांकडून १००० रुपये परीक्षा शुल्क घेऊही सरकारचं पोट भरतं नाहीय का ? म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असेल तर त्यासाठीही पैसे ओरबाडणार का ? या सरकारला नेमकी कोणती व्यवस्था हवी आहे ? सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी तुमच्यासाठी फक्त पैसे उकळण्याचं साधन बनलंय का ? असे तिखट सवाल त्यांनी केले आहेत. तसेच या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील, एवढं लक्षात ठेवावं… असा इशाराही दिला आहे. 


नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ता. 25, 26, 27 व 28 ऑक्टोंबर, व 9, 22 व 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या. त्या परिक्षेची उत्तरतालिका (Response Sheet) 30 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Savitribai Phule Pune University : विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागातील हस्तलिखिते अभ्यासक व संशोधकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार

सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना /आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. सदर सुचना / आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क 100 रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहेत. 

6 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतः च्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील वा त्यानंतरचे सुचना विचारात घेतले जाणार नसल्याचे संचालकयाने म्हटले आहे.